त्याला मेसेज केल्यावर तिला पोटात गुदगुल्या झाल्याच फिलिंग आलं. पाच मिनिट त्याच्या रीप्लायची वाट बघून रिप्लाय न आल्याने तिने दिवा बंद केला. तिला झोप लागत होती इतक्यात फोनचा मेसेंजर खणाणला. तिने लगबगीने उठून मेसेज पाहिला. रोहितने एक अश्लील क्लीप पाठवली होती आणि लिहील होत “ही तुला नक्की आवडेल…..” तो मेसेज आणि क्लिपिंग बघून मुग्धाची सटकली. आधी सांगून देखील रोहित असा का वागतोय असा प्रश्न तिला पडला. फोन बाजूला ठेऊन ती झोपली. पण डोळे बंद केल्यावर त्या क्लिपिंग मधले दृश्य तिच्या डोळ्यासमोर नाचू लागले. ती थोडी अस्वस्थ झाली. कूस बदलून विचार बदलायचा प्रयत्न तिने केला. पण डोळ्यासमोर तीच दृश्य दिसत होती. थोड्या वेळात ते सहन न होऊन मुग्धा परत उठली. तिने मेसेज डिलीट केला आणि रागाच्या तिरमिरीत रोहितचा नंबर ब्लॉक केला. फोन बाजूला ठेऊन मुग्धा बेडवर आडवी झाली. तिला काही क्षणात झोप लागली.
तिला पहाटे जाग आली ती मेसेजच्या टोन ने. म्हणजे तिची ती उठायचीच वेळ होती. पण जाग येत असताना मेसेज आला. तिने फोन पाहिला. मेसेज तेजसचा होता. “हो रुमाल माझाच आहे. मला त्याची काळजी वाटत होती. तुमच्याकडे आहे म्हणजे सुखात असेल. नशीब काढलं माझ्या रुमालाने. J “ तो मेसेज वाचून मुग्धाला छान वाटलं. न राहवून तिने रिप्लाय केला-
मुग्धा- हो का? कशावरून रुमाल सुखात आहे असं म्हणता? मालकाला मिस करत दु:खात पण असू शकतो ना तो?
तेजस- अहो तुमच्या सानिध्यात तो मालकाला विसरला देखील असेल. बघा तुमच्याकडे बघत हरवला असेल तो पण.
मुग्धा हे वाचून थोडी लाजली. अंगात एक शिरशिरी आल्यासारखं वाटलं. तिने थरथरत्या हातांनी रिप्लाय लिहिला-
मुग्धा- तो पण म्हणजे?
तेजस- तो पण म्हणजे जसे तुमचे रुमाल, ड्रेस, साड्या मालकिणीला बघून हरवत असतील तसाच आता तो पण हरवला असेल. कपड्यांना सौंदर्यातल खूप कळत.
मुग्धा- हो का? बराच हुशार दिसतोय रुमाल….मालकासारखा.
तेजस- मालक हुशार आहे हे तुम्हाला काय माहित?
मुग्धा- रुमालावरून कळत ना?
तेजस- ह्म्म्म….आज भेट होईल का?
हे वाचून मुग्धा परत एकदा खुश झाली.
तेजस- खूप इच्छा आहे. अर्थात तुम्हाला वेळ असेल तर. मी खूप मिस करतोय………
हे वाचून मुग्धा चक्क लाजली. पोटात फुलपाखर उडू लागली.
तेजस- तो पण मला मिस करत असेल. आमची भेट आज घडवून अनु शकता का तुम्ही? मी लिबर्टी क्लबला जातोय. एन्ट्रीवर गेस्ट साईन इन करून ठेवतो. माझं नाव सांगा. आत सोडतील. मी स्विमिंग पूल किंवा योगा रूम मध्ये असेन. जमेल का?
हे वाचून मुग्धाला हसू आल. तेजसचा सेन्स ऑफ ह्युमर आवडला. पण आज सकाळी? अमेयला शाळेत जायचं आहे. म्हणजे त्याला बस मध्ये बसवून, टायर होऊन क्लब मध्ये पोहोचायला किमान साडे आठ होतील. तिने रिप्लाय दिला-
मुग्धा- मला साडेआठ होतील. चालेल का?
तेजस- मी वाट बघतो. बाय.
मुग्धाने तो chat दोन तीनदा वाचला. प्रत्येक वेळी तो वाचताना तिच्या चेहऱ्यावर हसू उमटत होत. काहीतरी बर वाटत होत. मग त्याच आनंदात ती उठली. आज something to look forward to असल्याने आज पटापट काम करू लागली. रोजची काम आज मस्त वाटत होती. ती कामात असली तरी मनाने क्लब मध्ये पोहोचली होती. अमेय तिला म्हणाला पण की “आई आज तू इतकी खुश का आहेस?” तिला काय उत्तर द्यावं हे न सुचल्याने ती फक्त हसली. तिने अमेयला पटापट तयार करून बस मध्ये सोडला. मग घरी येऊन घड्याळात पाहिलं तर साडेसात झाले होते. ती घाई घाईने अंघोळीला गेली. आज अंघोळ करताना पण तिला अंगावर पडणार शावरच पाणी गुदगुल्या करत असल्याचा भास होत होता. मग दोन, तीन वेगवेगळे ड्रेस ट्राय केल्यावर तिने प्रशांतला आवडणारा तिचा ड्रेस सिलेक्ट केला. आरशात स्वतःला बघताना आज अनेक दिवसांनी तिने पोट कितपत दिसतय ह्याचा अंदाज घेतला. प्रशांत गेल्यापासून तिने साज शृंगार करण सोडून दिल होत. स्वतःकडे लक्ष देण्यात तर तिला अजिबात स्वारस्य उरलं नव्हत. पण आज मात्र काय झालं होत ते तिलाही कळत नव्हत. पोट व्यवस्थित आत असल्याचं पाहून तिला बर वाटलं. इतकी वर्ष काळजी घेतलेलं शरीर काही महिन्यांच्या दुर्लक्षाने फिटनेस सोडणार नव्हत!
मुग्धा तो प्रशांतचा आवडता स्लीव्हलेस ड्रेस घालून तयार झाली. मग त्याचं आवडतं परफ्युम तिने अंगावर, मानेवर आणि कानामागे फवारल. खूप दिवसांनी ती प्रशांत म्हणत असे तशी inviting दिसत होती. ते आठवून तिला हसू आलं. इतक्यात दाराची बेल वाजली. तिने दार उघडलं. दारात रोहित होता. तिला बघून तो खल्लास झाला. त्याची नजर तिच्या अंगावर टिकत नव्हती. जिथे जाईल तिथून घसरत होती. मुग्धाने दारातच विचारलं-
मुग्धा- काय पाहिजे?
रोहित- हे काय? आत नाही घेणार का?
मुग्धा- मी बिहर जाते आहे. काय काम आहे?
रोहित- मग एकदम जाऊ. मी तुला drop करतो ना.
मुग्धा – नको. काम काय आहे सांग. मला वेळ नाहीये.
रोहित- तुझ्यासाठी एक नोकरी आहे. त्या बद्दल बोलायचं होत. आत येऊ का?
मुग्धा- मला नोकरी नकोय.
रोहित- का? मग घर कसं चालवणार?
मुग्धा- मला नोकरी मिळाली आहे.
रोहित- अच्छा. अरे वा. म्हणजे त्या दिवशी इंटरव्ह्यू चांगला झाला तर. पण मला एका शब्दाने सांगितलं नाहीस.’
मुग्धा- सॉरी. विसरले. पण आता सांगितल ना? झालं?
रोहित- काल रात्रीचीक्लीप कशी वाटली? मला खात्री आहे तुला आवडली असणार. HD प्रिंट होती. माझ्याकडे फुल मूव्ही आहे. म्हटलं अमेय शाळेत गेला की निवांत बघू. येऊ का आत?
मुग्धा- रोहित मी तुला whatsapp वर ब्लॉक केला आहे. तुला आधीही सांगून तू मला अश्लील क्लीप पाठवलीस. ह्यापुढे पाठवू शकणार नाहीस. जा आता तू. मला उशीर होतोय.
मुग्धाने जोरात दार लावून घेतलं. रोहित अविश्वासाने बाहेर उभा होता. तो विचार करत होता की हिच्यात इतका कॉन्फिडन्स आलाय कुठून? त्याला त्याचा पत्ता पूर्ण कट झाल्याची जाणीव झाली. पण रोहित असा सहज हार मानणारा नव्हता. त्याच्या मनात आलं की ही इतक्या सकाळी इतकी टकाटक बनून कोणाला भेटायला चालली आहे? त्याने तिचा पाठलाग करायचा निर्णय घेतला. तो बिल्डींग बाहेर जाऊन त्याच्या गाडीत बसून राहिला.
पाच मिनिटांनी मुग्धा गेटजवळ आली आणि रिक्षात बसली. रोहित रिक्षाचा पाठलाग करू लागला. रिक्षा लिबर्टी क्लब नामक उच्चभ्रू क्लबच्या दारात थांबली. सिक्युरिटीने शिट्टी वाजवून रिक्षाला लांब पिटाळून क्लब मधून बाहेर येत असलेल्या Q7 ला वात मोकळी करून देऊन एक कडक सलाम ठोकला. मुग्धा रिक्षातून उतरून गेट जवळ आली. तिला क्लबमध्ये जाताना बघून रोहित चक्रावला. कारण तो क्लब म्हणजे शहरातील फक्त आणि फक्त गर्भ श्रीमंत लोकांची जागा होती. तिथे कितीही फी भरायची तयारी असलेल्या नवश्रीमंत लोकांना देखील मेंबरशिप मिळत नसे. तिथे मेंबर फक्त आणि फक्त मेंबर्सची मूल होत असत. मुग्धाने गार्डला तेजसच नाव सांगितल. गार्डने तिला व्हिजिटर पास दिला आणि गोल्फ कार्ट मधून स्विमिंग पूल जवळ तिला सोडण्यात आलं. तिथल्या हवेला सुद्धा श्रीमंतीचा वास, चव आणि attitude होता. मुग्धा थोडी बावरली होती. ती चालत चालत पुलाजवळ गेली. स्विमिंग करत असलेल्या तेजसला ती दिसल्यावर त्याने पाण्यातूनच तिला हात दाखवून एका टेबलवर बसायला सांगितल. मुग्धा रंगीत छत्रीने कव्हर केलेल्या एका टेबलाजवळ बसली.
दोनच मिनिटात तेजस स्विमिंग पूल मधून बाहेर आला. स्विमिंग ट्रंक मध्ये असलेला त्याचा पिळदार देह पाण्याने निथळत होता. त्याला बघून मुग्धाला तिच्या अंगातून वीज गेल्याचा भास झाला. उगाच घशाला कोरड पडली. त्याच्या अंगावरून निथळणार्या पाण्याबरोबर मुग्धाची नजरही त्याच्या अंगावर निथळत होती. तिचा जणू डोळ्यावरचा ताबा सुटला होता. कंबरेवर टॉवेल गुंडाळून तेजस तिच्या समोर येऊन बसला आणि तिच्या डोळ्यासमोर टिचकी वाजवून म्हणाला “काय madam कुठे गुंतलात?” मुग्धा अचानक भानावर आली. त्याच्या भरदार खांद्यांवर असलेली नजर तिने पटकन वळवली आणि ती पुलाकडे बघू लागली. ह्याच्या लक्षात आलं असेल का ह्या विचाराने घाबरून ती थोडी थरथरत होती. तिचं ते रूप तेजसला भावत होत. आता तो तिला बघू लागला. मग त्याने तिला विचारलं-
तेजस- काय घेणार आपण madam?
मुग्धा- एक सांगू का?
तेजस- सांगा.
मुग्धा- मला प्लीज madam नका म्हणू. माझं नाव मुग्धा आहे. आणि मला वाटत आपलं वर सारखंच असेल किंवा एखाद दोन वर्षांचा फरक असेल. सो मला अहो जाओ पण नका करू. फार कानकोंड होत.
तेजस- ठीक आहे. तुम्ही देखील मला तेजस म्हणत जा.
मुग्धा- हो. पण अहो तेजस बर का? मला तुम्हाला अरे तुरे नाही करता येणार. in fact त्रास होईल. सो प्लीज…
तेजस- तुम्हाला त्रास होईल अस काहीच मी तुम्हाला सांगणार नाही. अहो तेजस is fine. बर काय घेणार तू? कॉफी, टी ऑर…
त्या पॉज मध्ये मुग्धाने तेजसाकडे हसून बघितलं.
तेजस- कॉफी, टी ऑर ज्यूस?
तेजस जोरात हसला. मुग्धलाही हसू आलं. मुग्धाने कॉफी सांगितली. तेजस म्हणाला “मी आलोच चेंज करून.” तेजस गेल्यावर मुग्धा त्याचं पूल मधून बाहेर येतानाच रूप आठवून खुश होत होती. पाच मिनिटात तेजस आला. म्हणाला-
तेजस- मुग्ध तू हे कोणत परफ्युम लावतेस? जरा नाव सांग. खूप सॉलिड वास आहे ह्याचा. नाकातून डोक्यात आणि डोक्यातून मनात शिरतो आणि खूप वेळ तिथे घुटमळतो.
मुग्धा- हे प्रशांतच…म्हणजे माझ्या मिस्टरांच आवडत परफ्युम आहे. तो आणायचा त्याच्या एका इम्पोर्ट करणाऱ्या मित्राकडून.
तेजस- हम्म….त्यांची आवड मस्तच आहे…i must say….
हे बघताना तेजस मुग्धाच्या डोळ्यात पहात होता. मुग्धाने त्याच्याकडे पाहिलं आणि ती लाजली.
तेजस- अग खरच. काय वास आहे ह्या परफ्युमचा. खल्लास. बर माझा रुमाल दे. आम्ही दोघ एकमेकांना खूप मिस करतोय.
मुग्धा भानावर आली. तिने पर्स उघडली. आत शोधलं तर तिथे रुमाल नव्हता. ती घरातून निघताना काय केल ते आठवू लागली. रोहित गेल्यावर त्या रागात तिने पर्स भरली. आता तो जास्त वाटेला गेला तर स्पष्ट समज द्यायची नाहीतर सरळ अपमान करून हाकलून द्यायचा ह्या विचारांच्या तिरमिरीत ती दार बंद करून निघाली. ती रुमाल घ्यायला विसरली होती!
तेजस- काय ग काय झालं?
मुग्धा- तेजस….म…मला वाटत….मी घाईघाईत निघताना तुमचा रुमाल घ्यायला विसरले. तो घरीच राहिला आहे.
तेजस- what? are you kidding me? तू रुमाल द्यायला इथे येताना रुमालच विसरलीस?
मुग्धाला मेल्याहून मेल्यासारखं झालं रोहितचा प्रचंड राग आला. काय करावं सुचत नव्हत. तेजस म्हणाला-
तेजस- its okay मुग्धा. असं होत. आता मी तुला सोडायला येईन ना तेव्हा वर येतो. रुमाल मला देऊन टाक. ओके?
मुग्धाने मानेने हो म्हटलं.
तेजस- चल मग निघूया. मला ऑफिसला वेळेवर पोहोचायला हवं. आज जपानी डेलीगेट येणार आहे.
दोघे निघाले. तेजसची S 500 क्लबच्या गेट मधून बाहेर पडली. त्यात तेजसच्या शेजारी बसलेली मुग्धा बाहेर वाट बघत असलेल्या रोहितला दिसली. रोहितचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास नव्हता. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, राग, जेलसी, हार असे भाव एकत्र दिसू लागले. मुग्धा आणि तेजस S 500 च्या थंड पोकळीत काही न बोलता शांत बसले होते. फक्त दोघांची मनं गप्पा मारत होती.
(© मंदार जोग) क्रमश:गुंतता हृदय….(भाग-१२)

