….इतक्यात तिचा फोन वाजला. तिने अननोन नंबरवरून आलेला तो फोन घेतला. फोनवर समोरचा माणूस म्हणाला “तुम्ही प्रशांत साठेंच्या मिशेस का?” मुग्धा हो म्हणाली! समोरचा माणूस म्हणाला “मी पीएसआय जाधव बोलतोय. साठे साहेबांचा ऍक्सिडेंट झालाय. तुम्ही लगेच आरोग्यनिधी हॉस्पिटलला या!” हे ऐकून मुग्धाच्या डोळ्यासमोर अंधारल! काळजाचा ठोका चुकला. तिला दरदरून घाम फुटला! तिने टॉक्सिवाल्याला सांगितलं “आरोग्यनिधी हॉस्पिटलला घ्या! अर्जंट!” मुग्धाच्या डोळ्यात अश्रू होते. तिने अमेयचा हात घट्ट धरून ठेवला होता! अश्रूंमुळे बाहेरचे दिवे आणि भविष्य आता अंधुक दिसत होते!
टॅक्सी हॉस्पिटल जवळ आली. मुग्धाने टॅक्सी वाल्याला शंभराची नोट देऊन मोड परत न घेता हॉस्पिटलकडे धाव घेतली. रिसेप्शन वर पोलीस उभे होते. मुग्धा धावत येऊन म्हणाली “जाधव साहेब कुठे आहेत? मी मुग्धा साठे. त्यांचा फोन आला होता की…” हवालदार म्हणाला “या तुम्ही….” मुग्धा अमेयचा हात घट्ट धरून त्याच्या मागे निघाली. लिफ्ट साठी वाट बघताना प्रत्येक सेकंद तिला युगाप्रमाणे वाटत होता. लिफ्ट संथपणे खाली येत होती. समोरील डिस्प्लेवर 17…16…15 आकडे उमटत होते. मुग्धा अस्वस्थ होती. अमेयने विचारलं “काय झालंय बाबाला?” मुग्धाने त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिला रडू कोसळलं. ती त्याला जवळ घेऊन म्हणाली “काही नाही होणार बाबाला!” तिने हवालदाराला विचारलं “काय झालंय नक्की?” हवालदार निर्विकारपणे म्हणाला “तुम्ही साहेबांशी बोला!” इतक्यात लिफ्ट आली. त्यातील माणस सावकाश बाहेर पडत होती आणि मुग्धा पॅनिक होत होती. लिफ्ट रिकामी झाल्यावर ती धावत आत शिरली. हवालदाराने दहा आकडा दाबला. लिफ्ट मधील नकाशा दहाव्या मजल्यावर आयसीसीयू असल्याचं दर्शवत होता! हळू हळू लोक आत शिरले आणि लिफ्ट निघाली!
एक एक करत प्रत्येक मजल्यावर लिफ्ट थांबून लोकांना सोडत आणि गोळा करत होती. मुग्धाच बीपी वाढत होतं. अमेय देखील काहीतरी सिरीयस आहे ही जाणीव होऊन तिला बिलगला होता. लिफ्ट दहाव्या मजल्यावर आली. हॉस्पिटलचा टिपिकल, निराश, उदास वास मुग्धाच्या नाकात शिरला आणि तिच्या हृदयात चर्रर्र झालं. आयसीसीयू च्या बाहेर जाधव साहेब उभे होते. ते गंभीर आवाजात म्हणाले “नमस्कार. मी जाधव. मीच तुम्हाला…” त्यांना पुढे बोलू न देता मुग्धा म्हणाली “प्रशांत कुठाय? काय झालंय त्याला? मला त्याला भेटायचं आहे!” जाधव म्हणाले “त्यांची बाईक रस्त्यावर सांडलेल्या तेलावरून घसरली. ते लांब फेकले गेले आणि एका ट्रक ने त्यांना उडवलं आहे. ते क्रिटिकल आहेत!”
हे ऐकून मुग्धाच्या पायातील त्राण गेले? ती मटकन तशीच खाली बसली! तिला तशी बघून अमेय रडू लागला. तिचा ड्रेस ओढत म्हणू लागला “आई काय झालं? बाबा कुठे आहे?” तो तिचा ड्रेस ओढत होता आणि मुग्धा शून्यात हरवली होती! लेडी कॉन्स्टेबल ने पुढे येऊन मुग्धाला हाताला धरून उठवली आणि बाजूला असलेल्या खुर्चीवर बसवली. लेडी कॉन्स्टेबल म्हणाली “मॅडम भानावर या. तुमच्या घरी कोणी असतील तर त्यांना बोलवा प्लीज!” लग्नानंतर मुग्धा, अमेय आणि प्रशांत चे सगळे नातेवाईक तुटून ते तिघंच एकमेकांचे नातेवाईक असल्याने तिला कोणाला बोलवायचं हेच माहीत नव्हतं. तिने विषण्णपणे रोहितचा नंबर डायल करून फोन लेडी कॉन्स्टेबलला दिला. तिने फोन जाधवांना दिला. जाधव फोनवर बोलू लागले “नमस्कार मी जाधव बोलतोय. साठे साहेब क्रिटिकल आहेत…” बोलत बोलत ते लांब गेले!
रोहित म्हणजे प्रशांतचा बिल्डिंग मधला यार. त्यांच्या लग्नात साक्षीदार म्हणून रोहितची सही होती. मनमौजी स्वभावाच्या रोहितचे दोन डिव्होर्स झाले असल्याने आता लग्नाच्या भानगडीत न पडण्याचा त्याने निर्णय घेतला होता. उत्तम नोकरी, भरपूर पैसे आणि उमदे व्यक्तिमत्त्व असलेला रोहित भरपूर मैत्रिणी राखून होता. त्याच्यात अस काहीतरी होतं जे विविध वयोगटातील बायकांना भुरळ घालत असे! महिन्यातून एकदा तरी रोहित आणि प्रशांतची पार्टी होत असे. त्यात मुग्धाचाही ब्रीझर पुरता सहभाग असे! नातेवाईक नसलेल्या त्या दोघांना अनेक ओळखी असलेल्या रोहितचा आधार वाटत असे!
मुग्धा भकास बसून होती. अमेय बावरलेला होता. पोलिसांची कुजबुज सुरू होती. वेळ सावकाश पाझरत होता! तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले. मुग्धा धावत त्यांच्याजवळ गेली. म्हणाली “कसा आहे प्रशांत? मी त्याला भेटू का? बरा आहे ना तो?” डॉक्टर म्हणाले “ते क्रिटिकल आहेत. कोमात आहेत. मल्टिपल इंज्युरी झाल्या आहेत. डोक्याला मार बसला आहे. आम्ही व्हेंटिलेटर लावला आहे. तुम्ही दहा मिनिटांनी त्यांना बघू शकता. पण मी साजेस्ट करेन की नका बघू! तुम्हाला त्रास होईल.” डॉक्टर जड पावलांनी निघाले. मुग्धा सुन्न उभी होती. लिफ्टचा दरवाजा उघडला. डॉक्टर आत शिरले आणि त्याच लिफ्टमधून बाहेर येत असलेला रोहित तिला दिसला. मुग्धाने धावत जाऊन रोहितला मिठी मारली आणि ती हमसून हमसून रडत त्याला म्हणाली “रोहित, माझा प्रशांत क्रिटिकल आहे रे! कर ना काहीतरी!” मुग्धाने बोलताना त्याचा शर्ट इतक्या जोरात ओढला की त्याची वरची दोन बटणं तुटून पडली. मुग्धाने त्याला घट्ट मिठी मारली होती. रोहितने हळूच त्याचा हात तिच्या उघड्या पाठीवर फिरवायला सुरुवात केली. तिला अजून जवळ ओढून तो म्हणाला “मुग्धा काळजी नको करू. मी आहे ना!” एव्हाना मुग्धाच्या अश्रूंनी त्याचा शर्ट भिजला होता. त्याच्या पंजाची बोट तिच्या पाठीत रुतली होती. अनेक वर्षांच स्वप्न पुरं होण्याची शक्यता लक्षात आल्याने रोहितच्या डोळ्यातून वासना ओसंडून वाहात होती! हॉस्पिटल मध्ये शांतता होती!
क्रमशः
©मंदार जोग

