निवृत्ती नंतरचे आर्थिक नियोजन हा आजच्या काळात प्रत्येकाने गांभीर्याने विचार करण्याचा विषय आहे. कालच माझ्या एका मित्राचा फोन आला. आवाजात थोडीशी निराशा होती. तो एका मोठ्या IT कंपनीत वरिष्ठ पदावर काम करत होता. वय पंचेचाळिशीच्या आसपास. चांगला पगार, व्यवस्थित चाललेलं आयुष्य, मुलांचं शिक्षण, घराचा EMI, EPF, Mutual Funds… सगळं नियोजनाप्रमाणे सुरू होतं. पण कंपनीने अचानक Restructuring जाहीर केल आणि त्याच्या रोलची गरज नसल्याचं सांगून lay off package ऑफर केलं. एका दिवसात त्याची नोकरी गेली. “आता पुढे काय?” हा प्रश्न त्याच्यासमोर उभा राहिला. त्याच्याशी बोलताना मला जाणवलं की ही गोष्ट फक्त त्याची नाही. आज हजारो लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे.
आज IT क्षेत्रात हे वारंवार घडताना दिसत आहे. उद्या इतर क्षेत्रांमध्येही तेच चित्र दिसू शकतं. कारण कंपन्या इमोशनल नसतात. त्या इमोशनल निर्णय घेत नाहीत, त्या आर्थिक निर्णय घेतात. अमेरिकन कंपन्चाया तर laptop काढून घेऊन त्याच दिवशी घरी जायला सांगतात. कारण पंचेचाळीस वर्षांच्या कर्मचाऱ्याच्या पगारात अनेकदा दोन किंवा तीन तरुण कर्मचारी मिळतात. त्यांच्याकडे नवीन Technology असते, ते अधिक वेगाने शिकतात आणि कंपनीचा खर्चही कमी होतो. त्यामुळे चाळिशीनंतर अनेकांच्या डोक्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार कायम असते. हे वास्तव आहे. म्हणूनच नोकरी टिकेल या आशेवर जगण्यापेक्षा, नोकरी गेली तरी आयुष्य अडणार नाही अशी आर्थिक तयारी करणं जास्त महत्त्वाचं आहे.
समजा एखाद्या व्यक्तीची नोकरी व्यवस्थित सुरू राहिली आणि ती व्यक्ती साठाव्या वर्षी निवृत्त झाली, तरी प्रश्न संपत नाही. आज माणसाचं आयुर्मान खूप वाढलं आहे. निवृत्तीनंतर अनेक जण आणखी पंचवीस-तीस वर्षे जगतात. पूर्वी अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळायचं. आता नव्या पिढीतील बहुतांश लोकांकडे ती सुविधा नाही. म्हणजे निवृत्तीनंतरच्या संपूर्ण आयुष्याची आर्थिक जबाबदारी स्वतःलाच उचलावी लागणार आहे. म्हणूनच आज प्रत्येकाने स्वतःला एक साधा प्रश्न विचारायला हवा. “माझ्याकडे आज पुरेसे पैसे आहेत का की उद्या नोकरी गेली तरी माझ्या कुटुंबाचं आयुष्य विस्कळीत होणार नाही?”
एक साधं उदाहरण घेऊ. समजा एखाद्या सामान्य कुटुंबाचा आजचा मासिक खर्च ५० हजार रुपये आहे. अर्थात प्रत्येक कुटुंबाचा खर्च वेगळा असतो. हा आकडा फक्त उदाहरण म्हणून घेतला आहे. समजा त्या व्यक्तीचं आज वय ४५ वर्षे आहे आणि काही कारणाने तिला पन्नासाव्या वर्षी नोकरी सोडावी लागली. पुढील पाच वर्षांत महागाईमुळे आजचा ५० हजार रुपयांचा खर्च तेव्हा साधारण ६५ ते ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचलेला असेल. अशा परिस्थितीत पुढचं आयुष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहावं, यासाठी साधारण २.५ ते ३ कोटी रुपये त्या व्यक्तीच्या हाताशी असणं आवश्यक असू शकेल.
आता दुसरं उदाहरण. समजा एखाद्या व्यक्तीचं आज वय ४४ वर्षे आहे आणि ती साठाव्या वर्षी नियमित निवृत्त होणार आहे. महागाईमुळे आजचा ५० हजार रुपयांचा मासिक खर्च तेव्हा साधारण सव्वा लाख रुपयांच्या आसपास पोहोचलेला असेल. त्यामुळे निवृत्तीनंतर पंचवीस वर्षे आर्थिक ताण न येता जगण्यासाठी त्यावेळी साधारण ३.५ ते ४.५ कोटी रुपये हाताशी असणं योग्य ठरू शकतं.
हे आकडे ऐकून अनेकांना वाटेल की एवढे पैसे जमवणं अशक्य आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या. या रकमेमध्ये EPF मधून मिळणारी रक्कमही धरलेली असते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीच्या EPF मध्ये निवृत्तीच्या वेळी एक कोटी रुपये जमा झाले असतील आणि एकूण लक्ष्य चार कोटी रुपयांचं असेल, तर उरलेल्या तीन कोटी रुपयांची तयारी इतर बचत आणि गुंतवणुकीतून करावी लागेल.
नोकरी कधी जाईल हे आपल्या हातात नसतं. महागाई आपल्या हातात नसते. आयुष्य किती लांब असेल हेही आपल्या हातात नसतं. पण आर्थिक तयारी कधी सुरू करायची, हा निर्णय मात्र पूर्णपणे आपल्या हातात असतो. करिअरच्या सुरुवातीला या गोष्टी फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. पण चाळिशी ओलांडल्यानंतर त्याच गोष्टी आयुष्यातील सर्वात मोठा आधार बनतात.
फोन ठेवण्यापूर्वी मी त्या मित्राला विचारलं, “आता पुढे काय करणार?”
तो अगदी शांतपणे हसला आणि म्हणाला, “मी या दिवसाची तयारी अनेक वर्षांपूर्वीच केली होती. म्हणूनच मी नियमित गुंतवणूक करत राहिलो. आता पुन्हा नोकरी शोधण्याची माझ्यावर सक्ती नाही. मी आता नोकरी करणारच नाही. माझ्या छंदाला वेळ देणार, थोडंफार Consulting करणार आणि उरलेलं आयुष्य माझ्या अटींवर जगणार.”
त्याचं उत्तर ऐकून मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मोठा पगार म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नाही. नोकरी गेल्यानंतरही आयुष्य शांतपणे आणि सन्मानाने जगता येणं, हेच खरं आर्थिक स्वातंत्र्य आहे. डेट फ्री, emi free आयुष्य ही आर्थिक स्वातंत्र्याकडे नेणारी पहिली पायरी आहे.
माझा हा मित्र इतक्या आत्मविश्वासाने हे कसं म्हणू शकला? त्याने नेमकं कोणतं नियोजन केलं असेल? सामान्य पगार असलेली व्यक्तीही असं आर्थिक स्वातंत्र्य मिळवू शकत का?
याच विषयावर पुढच्या भागात सविस्तर लिहिणार आहे. तो वाचायला तुम्हाला आवडेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
क्रमश:
पुढील भागाची लिंक- उद्याच काय? — भाग २

[…] पहिल्या भागाची लिंक- उद्याचं काय?- भाग १ […]