hands forming a heart shape with sunset silhouette. Copy space text.

प्रशांत, मुग्धा आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा अमेय. मध्यम वर्गीय त्रिकोणी कुटुंब. प्रशांत आणि मुग्धाने पळून जाऊन आंतरजातीय विवाह केल्याने नातेवाईक संपलेले. म्हणून ह्या तिघांचे हे तिघेच नातेवाईक! आज लग्नाचा दहावा वाढदिवस. प्रशांतने आज हाफ डे रजा टाकली. सकाळपासून प्रशांत रोमँटिक मूड मध्ये होता. मुग्धाला अंदाज आला होता. ती पण अमेयच्या स्कुल बसची आतुरतेने वाट पहात होती. गेटजवळ आलेल्या बसमध्ये अमेयला बसवून आज रात्री बाहेर जेवायला गेल्यावर आईस्क्रीम खायच्या प्रॉमिसचा पुनरुच्चार करून ती घरी यायला निघाली तेव्हा तिच्या पोटात फुलपाखरं उडत असल्याचा तिला भास झाला! तिने एक आनंदाचा आवंढा गिळला आणि तिची पावलं घाईघाईने घराकडे वळली!

इमारतीत पोहोचल्यावर लक्षात आलं की लिफ्ट अचानक बंद झाली आहे. आता थांबणे किंवा बारा मजले चढून जाणे हे दोन पर्याय होते. पण दहा वर्षांनंतरही जराही कमी न झालेल्या प्रशांतच्या ओढीमुळे, त्याला दुपारी ऑफिसला जायचे असल्याने एकही सेकंद फुकट न घालवायच्या जाणीवेने तिने दुसरा पर्याय निवडला. ती चौतीस वर्षांची, सात वर्षाच्या अमेयची आई आहे हे तिला मुद्दाम सांगावं लागत असे. इतका तिचा फिटनेस होता. झरझर पायर्या चढत बाराव्या मजल्यावरील त्यांच्या घराची बेल दाबताना तिच्या चेऱ्यावर जमा झालेले घर्मबिंदू, गळ्याजवळ भिजलेला तिचा स्लिव्हलेस टीशर्ट, सुळसुळीत दंडावरून हातांवर ओघळणार्या घामाच्या धारा आणि तिच्या पर्फ्युमचा सुगंध तिला प्रचंड आकर्षक आणि मादक बनवत होता. अगदी प्रशांतला आवडणाऱ्या तिच्या रूपासारखा! तिला उभ्याउभ्या तो ट्रेक आठवला जिथे तिला अश्याच दमलेल्या अवतारात प्रशांतने मिठीत घेतली होती! पुढली संबंध रात्र पठारावरच्या त्यांच्या तंबूतला दिवा सुरू होता. प्रशांत सकाळी म्हणाला होता की “दमलेल्या तुला बघून डिझेल इंजिन आठवत. ते पण दमलं की खरा परफॉर्मन्स देतं!” हे ऐकून ती प्रचंड लाजली होती! तेव्हापासून हे सिक्रेट त्या दोघांनी अनेकदा जगल होत!

चार वेळा बेल वाजवून प्रशांतने दरवाजा उघडला नाही म्हणून तिने दरवाजाला हात लावला तर दरवाजा उघडा होता! तिला आश्चर्य वाटलं. ती घरात शिरली. प्रशांत दिसत नव्हता. ती किचन पर्यंत पोहोचली. प्रशांत तिथेही नव्हता. संडास आणि बाथरूम रिकामे होते. तिने हळूच बेडरूमचा दरवाजा ढकलला. आत एसी सुरू होता. सुगंधी मेंबत्त्यांचा मंद प्रकाश आणि सुगंध पसरला होता. पण प्रशांत तिथेही नव्हता. ती आश्चर्याने मागे वळली तर समोर प्रशांत उभा होता. घामाने डबडबलेल्या मुग्धाला आपल्या मिठीत घेत प्रशांत म्हणाला “लिफ्ट परत सुरू करून आलो!” ते ऐकून मुग्धा त्याच्या ओठाला चावत हसत म्हणाली “यु डॉग!” मग प्रशांतने तिला अलगद उचलून बेडरूम मध्ये नेली. सकाळची दुपार कधी झाली ते दोघांनाही कळल नाही!

मग एक वाजता प्रशांतच्या मिठीतुन कशीबशी सुटका करून घेत मुग्धा आपले कपडे गोळा करत बेडवरून उठली. प्रशांतला म्हणाली “तू शॉवर घे. मी जेवण गरम करते. ऑफिसला जायचं आहे ना?” तिचा हात धरून प्रशांत म्हणाला “आजच्या दिवशी एकट्याने शॉवर म्हणजे नाईन्साफी आहे!” मुग्धा आपला हात सोडवून घेत म्हणाली “अजून खूप आयुष्य आहे शॉवर घ्यायला. पण आत्ता ऑफिस आहे. पटकन तयार हो!” तो पुढे काही बोलायच्या आधी मुग्धा किचनमध्ये पळाली!

मुग्धाने त्याच्या आवडीची कांद्याच्या पातींची पीठ पेरून भाजी केली होती. त्याला आवडतात म्हणून खास गुलाबजाम होते. तिने जेवण गरम करून ताट वाढली. प्रशांत जेवायला बसला. त्याने दर ऍनिव्हर्सरीची मागणी केली. ती पुरी करत मुग्धाने त्याला जेवण भरवलं! मग त्याने गिफ्ट दिलेला डिझाईनर ड्रेस आज रात्री डिनरला घालायचं ठरल्यावर प्रशांत ऑफिसला गेला.

मुग्धा आजच्या सकाळच्या आठवणीत, प्रशांतचा धसमुसळेपणा आठवत डोळे मिटून पडून होती. मनावर आणि शरीरावर आलेल्या ग्लानीने तिचा सहज डोळा लागला! दचकून जाग आली तेव्हा अडीच वाजले होते. म्हणजे अमेयची बस अली असणार! ती ताडकन उठून बाहेर धावली! लिफ्टने खाली आली. गेटजवळ गेली. बस तिच्या नजरेसमोर निघून गेली होती! म्हणजे आता अमेयला शाळेत जाऊन आणावं लागणार! तिला स्वतःचाच राग आला. मग प्रशांतचा राग आला. “ह्याला काय हा गेला ऑफिसला. माझी काय अवस्था आहे ते बघ म्हणावं!” अस म्हणत ती रिक्षा पकडणार इतक्यात शेजारच्या विंग मधील प्रणवच्या आईचा फोन आला. ती म्हणाली “मी अमेयला उतरून घेतला आहे. तो प्रणव बरोबर जेवतो आहे. तू ये सावकाश. काळजी करू नको!” मुग्धाचा जीव भांड्यात पडला!

मग उरलेली दुपार अमेयचा गृहपाठ, टीव्ही, इतर कामात गेली. अमेयच्या जन्मानंतर मुग्धा नोकरी करत नसली तरी ती डबल ग्रॅज्युएट होती. अमेयच्या अभ्यासाची जबाबदारी तिच्यावर होती. जसजशी संध्याकाळ जवळ येऊ लागली तसतसा अमेय खुश होत होता. इतक्यात प्रशांतचा फोन आला. तो म्हणाला “ऑफिसात जरा ऑडिटर आलेत. निघायला उशीर होईल. मी डायरेक्ट बर्निंग ग्रील रेस्टोरण्टला येतो. तुम्ही साडेआठ पर्यंत पोहोचा!” साडेसहा झालेच होते. मुग्धा तयार होऊ लागली. त्याने गिफ्ट दिलेला नवा ड्रेस घालताना तिला आजचा त्याचा स्पर्श आठवत होता. मुग्धाला तयार झाली. ती आणि अमेय निघाले.

बिल्डिंग बाहेर येऊन त्यांनी टॅक्सी पकडली. टॅक्सी गर्दीतून मार्ग काढत होती. अमेयला बाहेरची गम्मत, दिवे, दुकानं बघून मजा येत होती. मुग्धाला संसाराची गेली दहा वर्ष आणि त्या आधी अफेयरची पाच वर्षे आठवत होती. तिने ह्या सुखासाठी मनोमन देवाचे आभार मानले. ह्या आनंदासाठी आज रात्री प्रशांतला काय आनंदच गिफ्ट द्यायचं ह्याचा विचार करत ती लाजत होती. इतक्यात तिचा फोन वाजला. तिने अननोन नंबरवरून आलेला तो फोन घेतला. फोनवर समोरचा माणूस म्हणाला “तुम्ही प्रशांत साठेंच्या मिशेस का?” मुग्धा हो म्हणाली! समोरचा माणूस म्हणाला “मी पीएसआय जाधव बोलतोय. साठे साहेबांचा ऍक्सिडेंट झालाय. तुम्ही लगेच आरोग्यनिधी हॉस्पिटलला या!” हे ऐकून मुग्धाच्या डोळ्यासमोर अंधारल! काळजाचा ठोका चुकला. तिला दरदरून घाम फुटला! तिने टॉक्सिवाल्याला सांगितलं “आरोग्यनिधी हॉस्पिटलला घ्या! अर्जंट!” मुग्धाच्या डोळ्यात अश्रू होते. तिने अमेयचा हात घट्ट धरून ठेवला होता! अश्रूंमुळे बाहेरचे दिवे आणि भविष्य आता अंधुक दिसत होते!

©मंदार जोग

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!