भाग २ : रिव्हर्स मॉर्गेजमध्ये वारसांचं काय? गैरसमज आणि वास्तव

रिव्हर्स मॉर्गेजचा विषय निघाला की एक प्रश्न हमखास विचारला जातो. “मग घराचं पुढे काय होणार?” अनेकदा या एका प्रश्नामुळे लोक योजना समजून घेण्याआधीच ती बाजूला ठेवतात. पण प्रत्यक्षात या विषयाभोवती अनेक गैरसमज आहेत.

समजा, नागपूरमधील एका ज्येष्ठ दांपत्याच्या मालकीचं घर आज तीन कोटी रुपयांचं आहे. निवृत्तीनंतर त्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे आणि त्यांनी रिव्हर्स मॉर्गेजचा पर्याय स्वीकारला. आता अनेकांना वाटतं की घर लगेच बँकेच्या मालकीचं होईल. प्रत्यक्षात तसं होत नाही. सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्यायला हवी. रिव्हर्स मॉर्गेज घेतलं म्हणजे घर विकलं असं होत नाही. घराची मालकी संबंधित व्यक्तींच्याच नावावर राहते. ते त्या घरात राहू शकतात. बँक त्यांना बाहेर काढू शकत नाही. ही योजना ज्येष्ठ नागरिकांना घर सोडल्याशिवाय आर्थिक आधार देण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

मग बँक पैसे कसे देते? घराच्या मूल्याचा काही भाग विचारात घेऊन बँक ठरावीक रक्कम मंजूर करते. ती रक्कम दरमहा, तिमाही किंवा इतर ठरावीक पद्धतीने दिली जाऊ शकते. मिळणारी रक्कम घराची किंमत, अर्जदारांचं वय, व्याजदर आणि बँकेच्या नियमांवर अवलंबून असते. मात्र इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. रिव्हर्स मॉर्गेजमध्ये मिळणारी रक्कम ही घराच्या संपूर्ण किमतीइतकी नसते. बँक काही प्रमाणात रक्कम उपलब्ध करून देते, कारण भविष्यातील जोखीम, व्याज आणि इतर बाबींचा विचार केला जातो. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित बँकेकडून सर्व अटी, शुल्क आणि नियम समजून घेणं आवश्यक आहे.

या योजनेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जोडीदाराचं संरक्षण. पती-पत्नी संयुक्त अर्जदार असतील आणि त्यातील एकाचा मृत्यू झाला, तरी दुसऱ्या व्यक्तीला घरात राहण्याचा अधिकार कायम राहतो. त्यामुळे उत्पन्न आणि निवारा या दोन्ही बाबतीत सुरक्षितता टिकून राहते. तसेच वारसांच्या दृष्टीने पाहिलं तर त्यांच्यासमोर साधारण दोन पर्याय असतात. एक म्हणजे बँकेची थकबाकी भरून घर स्वतःकडे ठेवणं. दुसरा म्हणजे घर विकणं. जर घर विकलं गेलं, तर विक्रीतून मिळालेल्या रकमेतून आधी बँकेची थकबाकी फेडली जाते. उरलेली रक्कम वारसांना मिळते.

समजा, काही वर्षांनी त्या घराची किंमत पाच कोटी रुपये झाली आणि बँकेची एकूण थकबाकी दोन कोटी रुपये झाली. अशा वेळी घर विकल्यास दोन कोटी रुपये बँकेला जातील आणि उर्वरित तीन कोटी रुपये वारसांना मिळतील. त्यामुळे रिव्हर्स मॉर्गेज घेतलं म्हणजे वारसांना काहीच मिळणार नाही हा समज चुकीचा आहे. याशिवाय अनेकांना अशी भीती असते की पालकांनी रिव्हर्स मॉर्गेज घेतल्यामुळे मुलांच्या हक्कावर परिणाम होईल. प्रत्यक्षात वारसांचा प्रश्न हा पालकांच्या निधनानंतर किंवा त्यांनी कायमस्वरूपी घर सोडल्यानंतर निर्माण होतो. तोपर्यंत घरात राहण्याचा अधिकार ज्येष्ठ नागरिकांकडेच असतो. पुढे पैशांची परतफेड केल्यास वारसांना त्यांचा हक्क मिळू शकतो.

त्यामुळे निर्णय घेताना भावनिक गैरसमजांपेक्षा प्रत्यक्ष नियम आणि आर्थिक गणित समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. कारण कोणताही आर्थिक निर्णय घेताना भावनेइतकंच गणितही महत्त्वाचं असतं. त्यामुळे या योजनेचा विचार करताना कुटुंबीयांशी चर्चा करणं योग्य ठरतं. विशेषतः मुलांना आणि संभाव्य वारसांना आधीच माहिती दिल्यास भविष्यातील गैरसमज टाळता येतात.

आपल्या देशात ही योजना फारशी लोकप्रिय नाही. त्यामागे आर्थिक कारणांपेक्षा मानसिक कारणं अधिक आहेत. घर पुढच्या पिढीसाठी ठेवायचं, घरावर कर्ज नको किंवा मुलांना सर्वकाही मिळालं पाहिजे, अशा भावना अनेकांच्या मनात असतात. त्या स्वाभाविक आहेत. पण प्रत्येक कुटुंबाची परिस्थिती वेगळी असते हेही तितकंच खरं आहे.

अनेकदा घराबाबतचा निर्णय हा केवळ आर्थिक नसतो, तर भावनिकही असतो. त्यामुळे रिव्हर्स मॉर्गेजचा विचार करताना “मुलांना काय मिळेल?” या प्रश्नाबरोबरच “आज आपलं आयुष्य अधिक सुरक्षित आणि सन्मानाने कसं जगता येईल?” हा प्रश्नही विचारायला हवा. पालकांनी स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या संपत्तीचा योग्य वापर केला, तर त्यातून पुढच्या पिढीवर आर्थिक अवलंबित्व कमी होऊ शकतं. अनेक वेळा आर्थिक स्वावलंबनामुळे नात्यांमध्येही अधिक मोकळेपणा आणि समाधान टिकून राहतं.

काही वेळा पालक आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात केवळ मालमत्ता जपण्याचा विचार करतात, पण स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात. आरोग्य, चांगली जीवनशैली, स्वावलंबन आणि मानसिक समाधान यांनाही तितकंच महत्त्व आहे. आयुष्यभर ज्या संपत्तीची निर्मिती केली, तिचा उपयोग स्वतःच्या सुरक्षित भविष्यासाठी करणं हा देखील आर्थिक नियोजनाचाच एक भाग आहे. जर एखाद्या ज्येष्ठ दांपत्याकडे मोठी मालमत्ता आहे, पण स्वतःच्या खर्चासाठी पुरेसं उत्पन्न नाही, तर त्या मालमत्तेचा काही भाग स्वतःच्या आयुष्यासाठी वापरण्यात चुकीचं काहीच नाही. शेवटी मालमत्तेचा उद्देश जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानाने जगता यावं हाच असतो.

आज आयुर्मान वाढत आहे. निवृत्तीनंतरची वर्षंही वाढत आहेत. त्यामुळे केवळ मालमत्ता असणं पुरेसं नाही, तर त्या मालमत्तेतून उत्पन्न निर्माण करणंही महत्त्वाचं ठरत आहे. रिव्हर्स मॉर्गेज हा त्यासाठी उपलब्ध असलेल्या पर्यायांपैकी एक आहे. तो सर्वांसाठी योग्य नसेल, पण ज्यांच्यासाठी योग्य आहे त्यांनी तरी त्याकडे पूर्वग्रह न ठेवता पाहायला हरकत नाही. कारण कधी कधी आपल्याच घरात आपल्या आर्थिक सुरक्षिततेची गुरुकिल्ली दडलेली असते. ©मंदार जोग

पहिल्या भागाची लिंक- रिव्हर्स मॉर्गेज भाग १

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!