पुण्यातील जोशी दांपत्याची गोष्ट. वय अनुक्रमे ६९ आणि ६४. आयुष्यभर नोकरी आणि व्यवसाय करून त्यांनी शहरात स्वतःचं घर उभं केलं. आज त्या घराची किंमत दोन-अडीच कोटी रुपयांच्या आसपास आहे. मुलगा हैदराबादला, मुलगी परदेशात. दोघेही आपल्या आयुष्यात स्थिरावलेले. जोशी दांपत्यालाही त्याबद्दल समाधान आहे. पण गेल्या काही वर्षांत एक वेगळीच चिंता डोकं वर काढू लागली. घर आहे, पण नियमित उत्पन्न नाही. वैद्यकीय खर्च वाढत आहेत. महागाई थांबायचं नाव घेत नाही. बँकेतील ठेवींचं व्याज खर्च भागवायला अपुरं पडू लागलं आहे.
ही गोष्ट फक्त जोशी दांपत्याची नाही. आपल्या आसपास अशा हजारो ज्येष्ठ नागरिकांची आहे. त्यांच्या नावावर लाखो किंवा कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असते, पण दैनंदिन खर्चासाठी पुरेसा रोख पैसा नसतो. आर्थिक भाषेत याला “ॲसेट रिच, कॅश पुअर” अशी संज्ञा वापरली जाते. म्हणजे संपत्ती आहे, पण हातात पैसा नाही.
नोकरीच्या काळात किंवा व्यवसायाच्या सुरुवातीच्या वर्षांत घर खरेदी करणं हे अनेक भारतीय कुटुंबांचं सर्वात मोठं आर्थिक ध्येय असतं. त्यासाठी अनेक वर्षे बचत केली जाते, कर्ज फेडलं जातं आणि अनेक इच्छा बाजूला ठेवल्या जातात. त्यामुळे निवृत्तीनंतर घर ही केवळ मालमत्ता राहत नाही, तर आयुष्यभराच्या मेहनतीचं प्रतीक बनतं.
मात्र निवृत्तीनंतर परिस्थिती बदलते. उत्पन्नाचा नियमित स्रोत कमी होतो, पण खर्च कमी होत नाहीत. उलट वय वाढल्यानंतर आरोग्याशी संबंधित खर्च, औषधोपचार, घराची देखभाल आणि दैनंदिन गरजा यामुळे आर्थिक नियोजन अधिक महत्त्वाचं ठरतं. अशावेळी मोठी मालमत्ता असूनही हातात सहज उपलब्ध पैसा कमी पडू शकतो.
भारतीय माणसासाठी घर हा केवळ आर्थिक विषय नसतो. त्यात भावना असतात, आठवणी असतात, आयुष्यभराचे कष्ट असतात. म्हणूनच घर विकण्याचा विचार अनेकांना पटत नाही. घर भाड्याने देण्याचाही पर्याय सगळ्यांसाठी व्यवहार्य नसतो. कारण मग स्वतः राहायचं कुठे हा प्रश्न उभा राहतो. अशा वेळी एक पर्याय पुढे येतो, ज्याची माहिती अजूनही अनेकांना नाही. तो म्हणजे रिव्हर्स मॉर्गेज.
हे नाव ऐकल्यावर अनेक जण दचकतात. कारण “मॉर्गेज” किंवा तारण हा शब्दच अनेकांना अस्वस्थ करतो. पण ही योजना नेहमीच्या कर्जापेक्षा वेगळी आहे. गृहकर्जात बँक आपल्याला पैसे देते आणि आपण बँकेला हप्ते भरत राहतो. रिव्हर्स मॉर्गेजमध्ये हे गणित उलट असतं. ज्येष्ठ नागरिक स्वतःचं राहतं घर बँकेकडे तारण ठेवतात आणि त्याच्या बदल्यात बँक त्यांनाच नियमित पैसे देते.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराची मालकी त्यांच्या नावावरच राहते. त्यांना घर सोडावं लागत नाही. ते आयुष्यभर त्या घरात राहू शकतात. म्हणजे घर विकल्याशिवाय त्यातून उत्पन्न मिळवण्याचा हा एक मार्ग आहे. ही योजना प्रामुख्याने साठ वर्षांवरील व्यक्तींसाठी आहे. पती-पत्नी संयुक्त अर्जदार असू शकतात. घर स्वतःच्या मालकीचं असणं आवश्यक असतं. त्यानंतर घराची किंमत, अर्जदारांचं वय आणि बँकेचे नियम यानुसार मिळणारी रक्कम ठरते.
रिव्हर्स मॉर्गेजची गरज समजून घेताना आणखी एक सामाजिक बदल लक्षात घ्यावा लागतो. आजच्या काळात निवृत्तीचं वय आणि आयुर्मान दोन्ही वाढलं आहे. पूर्वी निवृत्तीनंतरची काही वर्षे सांभाळण्याचं नियोजन केलं जायचं. आता मात्र निवृत्तीनंतर २० ते २५ वर्षांचं आयुष्यही अनेकांना जगावं लागतं. त्यामुळे केवळ निवृत्ती निधी पुरेसा आहे का, याचा नव्याने विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
खरं तर आपल्या समाजात एक मोठा बदल गेल्या दोन दशकांत घडला आहे. पूर्वी अनेक पिढ्या एकत्र राहत असत. आता मुलं शिक्षण, नोकरी किंवा व्यवसायासाठी वेगवेगळ्या शहरांत आणि देशांत स्थायिक होत आहेत. याचा अर्थ मुलं आई-वडिलांची काळजी घेत नाहीत असा अजिबात नाही. पण प्रत्येक मुलाला आई-वडिलांना स्वतःजवळ ठेवणं शक्य होतंच असं नाही. अनेक ज्येष्ठ नागरिकांनाही स्वतःचं घर, स्वतःचा परिसर आणि स्वतःची स्वतंत्र जीवनशैली सोडायची नसते.
अशा परिस्थितीत आर्थिक स्वावलंबन अधिक महत्त्वाचं ठरतं. अनेक ज्येष्ठ नागरिकांना मुलांकडे पैसे मागण्यापेक्षा स्वतःच्या संसाधनांचा उपयोग करून जगणं अधिक पसंत असतं. रिव्हर्स मॉर्गेजची संकल्पना याच गरजेतून महत्त्वाची ठरते.
अर्थात, हा पर्याय प्रत्येकासाठी योग्य असेलच असं नाही. ज्यांच्याकडे पुरेसं पेन्शन आहे, मोठी गुंतवणूक आहे किंवा ज्यांना मालमत्ता वारसांसाठी जशीच्या तशी राखून ठेवायची आहे, त्यांनी इतर पर्यायांचाही विचार करायला हवा. पण ज्यांच्याकडे घर आहे आणि उत्पन्न अपुरं पडत आहे, त्यांनी या पर्यायाबद्दल किमान माहिती तरी करून घ्यायला हरकत नाही.
आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी गुंतवणूक अनेकदा घर हीच असते. पण आपण त्याकडे फक्त राहण्याची जागा म्हणून पाहतो. कधी कधी त्याच घराकडे आर्थिक सुरक्षिततेच्या दृष्टीनेही पाहण्याची गरज असते. आयुष्यभर ज्या घरासाठी कष्ट केले, तेच घर उतारवयात आपल्या मदतीला धावून येऊ शकतं, ही कल्पना कदाचित सुरुवातीला नवीन वाटेल. पण बदलत्या काळात तिचा विचार करणं नक्कीच गरजेचं आहे. ©मंदार जोग
पुढील भागाची लिंक- रिव्हर्स मॉर्गेज भाग २
